उपयोगिता म्हणजे काय ? उपयोगितेची वैशिष्ट्ये ! उपयोगिता व उपयुक्तता फरक ! उपयोगिता व आनंद फरक ! उपयोगिता व समाधान फरक /
प्रश्न :- उपयोगिता म्हणजे काय ?
कोणताही व्यक्ती किंवा ग्राहक एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करीत असताना सर्वप्रथम ती वस्तू उपयोगी किंवा त्यामध्ये उपयोगिता आहे किंवा नाही याचा विचार करून खरेदी करत असतो त्यामुळे ग्राहकांचा अभ्यास करून मांडलेले अर्थशास्त्रातील अनेक संकल्पना व सिद्धांत समजून घेण्यासाठी उपयोगिता म्हणजे काय हे अभ्यासणे आवश्यक आहे
व्याख्या :- उपयोगिता म्हणजे, "वस्तू व सेवा मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची असलेली शक्ती किंवा क्षमता" म्हणजे उपयोगिता होय.
उदा. लिहिण्याची गरज पूर्ण करण्यासाठी पेन, वही आवश्यक असते त्यामुळे पेन व वही उपयोगी आहे किंवा उपयोगिता आहे असे म्हणतात तसेच माणसाच्या अन्न ,वस्त्र,निवारा औषधे ,करमणूक चैनीच्या वस्तू या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण वापरत असलेले अन्नधान्य, कपडे, घर, घरातील सर्व वस्तू, घड्याळ, रूमाल, पुस्तके, बॅग, कंपास, पाणी सूर्यप्रकाश, सूर्याची उष्णता, तसेच वकील, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, बँक, विमा, रस्ते, रेल्वे, टेलीफोन, वाचन, ताजमहाल, पर्यटन इत्यादी अनेक सेवांमध्ये ही मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्यालाच उपयोगिता असे म्हणतात..
उपयोगितेची वैशिष्ट्ये:-
उपयोगितेची प्रामुख्याने पुढील वैशिष्ट्ये आहेत
1) अदृश्य शक्ती:-
उपयोगिता ही वस्तू व सेवा मधील मानवी गरज भागविण्याची असलेली एक अदृश्य शक्ती आहे ती जाणवते मात्र संखेत मोजता येत नाही
2) व्यक्तीसापेक्ष किंवा व्यक्तिनिष्ठ संकल्पना:-
म्हणजेच एखाद्या वस्तूमधील उपयोगिता ही व्यक्तीनुसार बदलत जाते उपयोगिता मानसशास्त्रीय संकल्पना आहे कारण प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड, सवय, स्वभाव, विचार ,बुद्धी, तत्त्वे, आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, व्यवसाय इ. परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे व्यक्तीनुसार एखाद्या वस्तूतील उपयोगिता ही बदलत जाते.उदा. शिक्षकांना खडू डस्टर, तर डॉक्टरांना स्टेथोस्कोप, साक्षर व्यक्तीला पेनमध्ये उपयोगिता जाणवते मात्र याच वस्तूंमध्ये इतर लोकांना उपयोगिता जाणवत नाही त्यामुळे उपयोगिता व्यक्तीसापेक्ष किंवा व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे असे म्हटले जाते..
3) स्थल सापेक्ष व काल सापेक्ष संकल्पना:-
उपयोगिता ही स्थल सापेक्ष असते म्हणजेच एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्यानंतर त्या वस्तूत उपयोगिता निर्माण होते उदा. जंगलातील लाकडे ,खनिजे तसेच नदीतील वाळू ,मासे शहरी भागात आणल्यास उपयोगिता निर्माण होते तसेच उपयोगिता काल सापेक्ष आहे म्हणजेच कालावधी किंवा हंगाम बदलल्यानंतर त्या वस्तूमधील उपयोगिता बदलते उदा. पावसाळ्यात रेनकोट ,छत्री हिवाळ्यात लोकरीचे कपडे तर उन्हाळ्यात सुती कापड, पंखे ,कुलर या वस्तूची उपयोगिता निर्माण होते व हंगाम संपल्यानंतर उपयोगिता कमी होते त्यामुळे उपयोगिता स्थल सापेक्ष व काल सापेक्ष आहे असे म्हटले जाते.
4) उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते :-
एखादी वस्तू चांगली - वाईट किंवा योग्य -अयोग्य आहे हे सांगणे म्हणजे नैतिकता होय मात्र उपयोगितेत व अर्थशास्त्रात नैतिकतेचा विचार केला जात नाही. उदा. गृहिणींसाठी चाकू मध्ये उपयोगिता आहे, व्यसनी व्यक्तीला सिगारेट, तंबाखू मध्ये उपयोगिता आहे मात्र या वस्तू खरेदी करणे चांगले किंवा वाईट हे सांगितले जात नाही त्यामुळे उपयोगिता नैतिक दृष्ट्या तटस्थ संकल्पना आहे असे म्हटले जाते
5) उपयोगिता व उपयुक्तता यात फरक आहे:
उपयोगिता
A) उपयोगिता ही वस्तू व सेवा मधील मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली शक्ती होय.
B)उपयोगिता ही वस्तू सापेक्ष म्हणजे वस्तूमध्ये अस्तित्वात असते .
C)उदा. निरक्षर व्यक्ती जवळ असलेल्या पेनमध्ये उपयोगिता असते मात्र उपयुक्तता नसते
उपयुक्तता :-
A) उपयुक्तता म्हणजे प्रत्यक्ष वस्तूचा वापर करून गरज पूर्ण करणे होय
B) उपयुक्तता ही व्यक्तीसापेक्ष म्हणजे व्यक्तीवर अवलंबून असते
C)उदा. साक्षर व्यक्ती जवळील पेनमध्ये उपयोगिता व उपयुक्तता दोन्ही घटक असतात
6) उपयोगिता व आनंद यात फरक आहे:-
A) उपयोगीता ही वस्तू व सेवा मधील मानवी गरज पूर्ण करण्याची असलेली क्षमता किंवा शक्ती होय तर आनंद हे वस्तूच्या उपभोगा पासून व्यक्तीला मिळणारी मानसिक संकल्पना आहे
B) उपयोगिता वस्तूमध्ये अस्तित्वात असते तर वस्तूच्या उपभोगापासून आनंद मिळेलच हे सांगता येत नाही.
C) उदा. आजारी व्यक्तीला इंजेक्शन मध्ये उपयोगिता जाणवते तर आजारी व्यक्तीला इंजेक्शन घेतल्यानंतर तो बरा होतो मात्र त्यापासून आनंद मिळेलच हे सांगता येत नाही
7) उपयोगिता व समाधान यांच्यात फरक आहे उपयोगिता:-
A) उपयोगिता ही वस्तू मधील मानवी गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे
B) प्रथम गरज म्हणजेच उपभोग निर्माण झाल्यानंतर उपयोगिता निर्माण होते.
C) उदा व्यक्तीला गरज तहान लागल्यानंतर पाण्यात उपयोगिता जाणवते
D) पाणी तहान लागणे म्हणजे उपभोगाचे कारण म्हणजे पाण्यातील उपयोगिता आहे
समाधान :-
A) वस्तूच्या प्रत्यक्ष वापर किंवा उपभोगा नंतर मिळणारा परिणाम म्हणजे समाधान होय.
B) उपभोगानंतर समाधान निर्माण होते
C) उदा व्यक्तीला प्रत्यक्ष म्हणजे पाणी पिल्यानंतर समाधान मिळते
D) पाणी उपभोगाचा परिणाम म्हणजे समाधान होय...
8) उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे:-
म्हणजेच वस्तू पासून मिळणारी उपयोगिता ही अदृश्य मानसशास्त्रीय संकल्पना आहे ती धनात्मक, शून्य किंवा ऋणात्मक आहे हे जाणवते किंवा सांगता येते. उदा.तहानलेल्या व्यक्तीला सुरुवातीला पाणी देत गेल्यास उपयोगिता मिळताना धनात्मकता जाणवते गरज संपल्यानंतर पाण्यातील उपयोगिता शून्य होते व त्यानंतरही गरजेपेक्षा जास्त पाणी पिल्यास त्रास होऊन उपयोगिता ऋणात्मक होते हेच तात्विक मापन करता येते.
9) उपयोगिता व गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते:-
म्हणजेच वस्तूची गरज जास्त असल्यास उपयोगिता जास्त जाणवते व गरज संपल्यास उपयोगिता कमी होते उदाहरणार्थ तहानलेल्या व्यक्तीला सुरुवातीस पाण्यात प्रचंड उपयोगीता जाणवते व गरज संपल्यानंतर त्याच पाण्यामध्ये उपयोगिता जाणवत नाही .
10)उपयोगिता मागणीचा आधार आहे:-
म्हणजेच वस्तूमध्ये उपयोगिता असल्याशिवाय ग्राहक वस्तूची मागणी करत नाही म्हणजेच मागणी व मागणीचा सिद्धांत हा उपयोगीतेवर आधारित आहे उदा. आजारी व्यक्तीला औषधांमध्ये उपयोगिता जाणवते त्यामुळेच तो औषधांची मागणी करतो म्हणजेच मागणी उपयोगीतेवर अवलंबून असते.
अशा प्रकारे उपयोगीता व उपयोगीतेची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात
उपयोगिता व उपयोगितेची वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा युट्युब वरील माझ्या व्हिडिओची लिंक पुढे दिलेली आहे त्यावर क्लिक करा👇
👉 https://youtu.be/P6Qznu2bqQU
बनसोडे सर v.s.
विषय अर्थशास्त्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt let me know